काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपात…पण…भाजप नेत्याचा दावा
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही. त्याचा प्रत्यय गेल्या दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांमधून महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून वारंवार सरकार पाडून दाखवा, असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी सरकार पडलं तर तुम्हाला माहितही पडणार नाही, असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्यानंतर काही महिन्यांनी अगदी तशाच घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातून शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्यात भाजपसोबत नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळे नेतेमंडळींकडून केले जाणारे वक्तव्य महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे भाजप आमदार संजय कुटे यांनी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. पटोले हे काही दिवसांनी भाजपात येतील, असा दावा कुटे यांनी केला आहे. कुटे फक्त दावा करुन थांबले नाहीत तर त्यांनी पुढे पटोलेंना डिवचलं देखील आहे. पटोले हे भाजपात येतील, पण आम्ही घेणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये यावं अशी ऑफर देणारे काँग्रेसचे नाना पटोले हेच काही दिवसांनी भाजपात येतील. पण आम्ही त्यांना घेणार नाही”, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी लगावलाय. “नितीन गडकरींसारख्या नेत्यावर बोलण्याची नाना पटोले यांची कुवतच नाही”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. अकोला येथे शनिवारी (१०सप्टेंबर) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींना दिलेल्या ऑफरवर संजय कुटे यांनी आज शेगावात पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
आगामी सगळ्या निवडणुका शिंदे गट आणि आम्ही एकत्रपणे लढू आणि जिंकू, असे संजय कुटे यांनी शेगावात जाहीर केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची शिवसेना आहे. तर शिंदे गटातील शिवसेना ही अस्सल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असल्याची टीका देखील त्यांनी केली.
काँग्रेसमधील मोठा गट फुटणार?
काँग्रेसमधील मोठा गट हा नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा वारंवार रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे चव्हाण यांनी त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. तरीही काँग्रेसमधील मोठा गट फुटणार असल्याच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. पण याबाबत अधिकृत अशा कोणत्याही माहितीचा दुजोरा नाही. विशेष म्हणजे राज्यात जेव्हा नवं सरकार स्थापन झालं तेव्हा काँग्रेस आमदारांचा एक गटही शिंदेंच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण तसं काहीच घडलेलं नाहीय.