श्री गणेशाचा जन्म कसा झाला? रंजक कथा वाचा, संकटे होतील दूर
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यंदा गणेश चतुर्थीचा सण आज ३१ ऑगस्टला साजरा होणार. या दिवसापासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करून या उत्सवाची सांगता होणार आहे. गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. कारण भगवान गणेशाचा जन्म याच तिथीला झाला होता. त्यांचा जन्म कसा झाला? त्यामागेही एक अतिशय रंजक कथा आहे. ज्याचे नुसते वाचन किंवा श्रवण केल्याने सर्व दुःख दूर होतात.
गणपतीच्या जन्माची रंजक कथा
शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेश.. या गणेशजन्माची रंजक कथा अशी की, पार्वती देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला, एके दिवस पार्वती स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली. आईचा आदेश मानून गणपती व्दाराजवळच बसून राहिला. तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून, पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले. मात्र, गणेशाने ते ऐकले नाही. आईची आज्ञा पाळण्याचा संकल्पच त्याने घेतला होता. महादेवांनी गणपतीला समजावले. मात्र, तो हटला नाही. शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्ध झाले. आणि महादेवांनी त्रिशुळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या. अत्यंत क्रोधीत झाल्या. माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत केले नाही, तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वतीने महादेवांना सांगितले. त्यानंतर शंकरांनी तातडीने नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले. महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले. यानंतर सर्व देवांनी गणपतीला प्रथम पूजनीयचे वरदान दिले.
गणेश चतुर्थीच्या करा हे उपाय
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाला अभिषेक केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. गणेशाच्या अभिषेकानंतर गणपती अथर्वशीर्षाचा पाठ अवश्य करावा.शास्त्रात गणेश यंत्राचे वर्णन अतिशय चमत्कारिक साधन म्हणून केले आहे. चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना विशेष फलदायी असते. घरामध्ये या यंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही.गणेश चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला. श्री गणेशाच्या मंदिराला भेट द्या आणि त्याला प्रार्थना करा. हत्तीला हिरवा चारा दिल्यास या समस्या लवकर संपतात. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान केल्यानंतर गणेशाला गूळ आणि शुद्ध तूप अर्पण करावे. यानंतर या भोगाचा नैवेद्य गायीला खाऊ घाला. या उपायाने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वैवाहिक जीवनात अडचणी आल्यास गणेश चतुर्थीचे व्रत ठेवा आणि बाप्पाला मालपुवा अर्पण करा. यामुळे लवकरच विवाह होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करणे देखील शुभ आहे.