भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयमहाराष्ट्रसामाजिक

सर्वपित्री अमावास्या शुभ की अशुभ?अमावस्या वाईट असते का? अमावास्येला नकारात्मक घटना जास्त घडतात का?

मंडे टु मंडे न्यूज वृत्तसेवा।  गेल्या १५ दिवसांपासून पितृपक्ष सुरु आहे. आज रविवारी म्हणजेच २५ सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्येने पितृपक्ष समाप्त होईल. आजच्या या दिवशी श्रद्धेने पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त केली जाते. सर्वपित्री अमावास्या शुभ की अशुभ? या दिवशी एखादे महत्त्वाचे काम करावे का? अमावस्या वाईट असते का? अमावास्येला नकारात्मक घटना जास्त घडतात का? सर्वसामान्य माणसाच्या मनात अमावास्येविषयी असे असंख्य प्रश्न असतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, खरंच अमावस्या अशुभ असते का?

‘अमा’ म्हणजे सह, ‘वस्’ म्हणजे राहणे. ‘सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या’ म्हणजे सूर्य चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या म्हणावं असे सांगण्यात आले आहे. अमावास्येला पृथ्वीच्या संदर्भात चंद्र व सूर्य एकाच रेषेत येतात. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत शुक्लपक्षात चंद्राचे सूर्यसापेक्ष कोनात्मक अंतर वाढत जाते. पौर्णिमेलाच ते १८० अंश होते. कृष्णपक्षात चंद्र व सूर्य यांमधील कोनात्मक अंतर कमी कमी होत जाते.

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार, अमावस्या म्हणजे ज्या तिथीला चंद्र दिसत नाही अशी व्याख्याही प्राचीन एका ग्रंथामध्ये केली आहे. अमावास्येचा उल्लेख ऋग्वेदात नाही. परंतु सूर्यग्रहण हे अमावास्येलाच होते आणि सूर्यग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. अथर्ववेदात अमावास्येसंबंधी एक सूक्त आढळते. सध्या काही लोक अमावास्या ही अशुभ असते असे मानतात. परंतु प्राचीनकाळी अमावास्या ही शुभ मानली जात असे. अथर्ववेदातील सूक्तामध्ये अमावास्या म्हणते “समस्त देव माझ्याप्रत येऊन माझ्या ठायी निवास करतात. साध्यादी देव, तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्यासह राहत असल्यानेच मला अमावास्या हे नाव मिळाले.”

रामायणात आढळतो अमावास्येचा उल्लेख
“अमावास्येची रात्र आम्हास धनदायी होवो.” असेही एका सूक्तामध्ये सांगितले आहे. रामायणकाली अमावास्या शुभ मानत होते असे उल्लेखही सापडतात. रावणाचा सुपार्श्व नावाचा बुद्धिमान अमात्य रावणाला म्हणाला, “आज कृष्णपक्षातील चतुर्दशी आहे. यासाठी तू आजच युद्धाच्या तयारीला लाग आणि सेनेला बरोबर घेऊन तू उद्या अमावास्येच्या मुहूर्तावर विजयासाठी बाहेर पड.”

महाभारतात मात्र काही ठिकाणी अमावास्या ही शुभ मानलेली आहे. तर काही ठिकाणी अशुभ मानलेली आहे. कृष्णाने कर्णाजवळ युद्धघोषणा करतांना म्हटले आहे, “आजपासून सातव्या दिवशी अमावास्या आहे. इंद्र ही तिची देवता आहे. त्या दिवशी युद्धाला प्रारंभ होईल.” श्रीकृष्णाला यादवांच्या विनाशाची जी लक्षणे दिसत होती, त्यातच त्यांनी ‘त्रयोदशीयुक्त अमावास्या ‘ हा एक योग सांगितला आहे. भारतीय युद्धाच्यावेळी असाच योग होता. हेही त्याने याच वेळी सांगितले आहे. महाभारतात एके ठिकाणी अमावास्येचा ‘एक भयंकर मुहूर्त‘ असा उल्लेख केलेला आहे.

अमावस्येचे दोन प्रकार आहेत
अमावास्येचे दोन प्रकार आहेत. एक ‘’सिनीवाली’ आणि दुसरी ‘कुहू’. “या पूर्वा अमावास्या सा सिनीवाली । या उत्तरा सा कुहू:” असे वचन आहे. म्हणजेच कृष्ण चतुर्दशी युक्त अमावास्येला ‘सिनीवाली‘ म्हणतात आणि शुक्ल प्रतिपदायुक्त अमावास्येला ‘कुहू‘ म्हणतात. असे अनेक प्राचीन ग्रंथांमधून सांगण्यात आले आहे. दिनमानाचे पाच भाग करावे. पहिला भाग प्रात:काळ, दुसरा भाग संगवकाळ, तिसरा भाग मध्यान्हकाळ, चौथा भाग अपराण्हकाळ आणि पाचवा भाग सायंकाळ मानावा असे सांगण्यात आले आहे. अपराण्हकाळी अमावास्या असेल त्या दर्श अमावास्येस अमावास्या श्राद्ध करावे असे सांगण्यात आले आहे. अमावास्येला नदीस्नान करण्याची प्रथाही प्राचीनकाळी होती. भारतात अनेक ठिकाणी अमावास्येच्या दिवशी सूर्यपूजा व व्रतवैकल्ये करण्याचीही प्रथा आहे.

  • वैशाख अमावास्येला ‘भावुका अमावास्या‘ म्हणतात.
  • अमावास्या सोमवारी आल्यास तिला ‘सोमवती अमावास्या‘ म्हणतात. या दिवशी महिला अश्वत्थाची पूजा करून त्याला १०८ वस्तू अर्पण करतात.
  • आषाढातील अमावास्या ‘दिव्याची अमावास्या‘ असते. या दिवशी दीपपूजन केले जाते.
  • श्रावणातील अमावास्येस ‘पिठोरी अमावास्या‘ म्हणतात.
  • भाद्रपद अमावास्या ही ‘सर्वपित्री अमावास्या‘ म्हणून मानली जाते.
  • आश्विनातील अमावास्या ‘लक्ष्मीपूजनाची अमावास्या’ ही मंगलदायक मानली जाते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!