यंदा गणेशोत्सवात वाढणार पावसाचा जोर, १ सप्टेंबर पासून दमदार पाऊस
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात बाप्पाच्या आगमनासह वरुणराजाचेही पुनरागमन होणार आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. यात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस दडी मारून बसला आहे. तर काही ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यात मुंबई, ठाण्यासह डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात काही प्रमाणात हलका पाऊस सुरु आहे. मात्र काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. तर १ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
त्यामुळे पुढील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे दमदार पुनरागमन होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यात आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हे शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांनी पुर्व योग्य नियोजन करण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक नदी, पाठबंधारे आणि धरणांतील पाणी पातळीत वाढ झाली आहे, जूनमध्ये दडी मारलेल्या या पावसाने जूलैमध्ये दमदार बॅटिंग केली. जुलै ते ऑगस्टचे दोन आठवडे राज्यात दमदार पाऊस बसरला. यात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नदी, समुद्रालत गावांनाही याचा फटका बसला. नदी नाल्यांना आल्याने वाहतुक व्यवस्थेवरही परिणाम झाला होता. तसेच शेती पिकांचेही नुकसान झाले होते