पितृपक्ष नेमका भाद्रपद महिन्यातच का..? जाणून घेऊया
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमे पासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत पितृपक्ष साजरा केला जातो. या काळात घरातील पितरांचे स्मरण केले जाते. यासह पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी मोठ्याप्रमाणावर श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जातात. पितरांच्या स्मरणाचा हा पितृपक्ष नेमका भाद्रपद महिन्यातच का येतो? असा प्रश्न आपल्याला पडतो. याचे उत्तर आपण ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेवूया.
पितृपक्षात पितरांच्या मोक्ष प्राप्तीसाठी तथा पितरांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेच पितृपक्षात श्राद्धादी कर्म केले जातात. भाद्रपद कृष्ण पक्षातच पितृपक्ष का साजरा केला जातो यावर ज्यातिष अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, पितृपक्ष साजरे करण्यामागे भारतीय कालगणना, वैदीक गणित आहे. पितरांची मुख्य देवता यम आहे. या देवतेच जे लोक आहे त्याला यम लोक असे म्हणतात. हा यमलोक अंतरिक्षामध्ये आहे. यालाचा पितृलोक असेही म्हणतात. पितृलोकाचा अधिपती हा यम आहे.
वैदीक गणिताप्रमाणे अंतरिक्षामध्ये ग्रहांच परिवलन होत असतं, त्यावेळी रवि (सुर्य) विशाखा नक्षत्रात जातो. वैदीक गणितानुसार यावेळेस केलेले कार्य हे पितृलोकाशी संबंधीत असतात. या काळात पितृ जागृत रुपाने वायु अवस्थेत पृथ्वीवर अवतरतात त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान म्हणून आपण जे श्राद्धादी पितृकर्म करतो हे त्यांना त्वरीत प्राप्त होते. त्यामुळे विशाखा नक्षत्र असताना पितृपक्ष असतो. आणि याकाळात पितरांसाठी श्राद्धादी कर्म जसे कि तर्पण, पिंडदान केले जाते.