महाशिवपुराण कथा ; महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवणार
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | १० ते १६ मार्च दरम्यान भुसावळ जवळील अकलूद शिवारात परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा सीहोरवाले यांच्या सुश्राव्य वाणीतून महा शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून शिवपुराण कथेला आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता भुसावळातील रस्ते गर्दीने फुलणार आहे. या पार्श्वभूमीवर ४ मार्च बुधवार रोजी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ मार्गावरील सर्व अतिक्रमित दुकाने, लोटगाड्या, टपऱ्या हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिवपुराण कथेच्या अनुषंगाने आज वा उद्यापासून शहरातील गांधी पुतळा ते कथास्थळ या मार्गावरील सर्व टपऱ्या व हातगाड्या हटवून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. बुधवारी कथास्थळी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी संबंधित विभागांना हे निर्देश दिले. या बैठकीला फैजपूरचे प्रांत बबन काकडे, डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, सहा. पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, तहसीलदार नीता लबडे, वाहतूक शाखेचे अधिकारी उमेश महाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाविकांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांवरही चर्चा करण्यात आली.


