भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

Mahashivratri : आज महाशिवरात्री, आख्यायिका, सर्वात काळोखी रात्र, जाणून घ्या

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो,आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात.

हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे” स्मरण आहे. या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती ५ व्या शतकात झाली असे मानले जाते.

महाशिवरात्री उत्सवाच्या आख्यायिकेनुसार, लुब्धक नावाचा एक गरीब आदिवासी शिकारी माणूस हा शिवभक्त होता. तो एकदा घनदाट जंगलात सरपण घेण्यासाठी गेला होता. अंधार पडल्यामुळं तो जंगलात भरकटला. त्याला घराचा रस्ता सापडत नव्हता.

अंधारात लुब्धक एका बेलाच्या झाडावर चढला. पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्यानं झाडाच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतला. संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा आवाज ऐकत होता. तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळं झाडावरुन उतरायलाही त्याला भीती वाटत होती. स्वतःला जागं ठेवण्यासाठी त्यांनं शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक-एक पान तोडून टाकत होता.

सूर्योदयापर्यंत त्यानं हजारो पानं एका शिवलिंगावर टाकली होती. अंधारात तिथलं शिवलिंग त्यानं पाहिलं नव्हतं. लुब्धकानं रात्रभर केलेल्या उपासनेमुळं भगवान शंकर प्रसन्न झाले. शिवाच्या कृपेनं वाघ आणि वन्य प्राणी तिथून निघून गेले. लुब्धक केवळ बचावला नाही तर त्याला ‘दैवी आशीर्वाद’ही मिळाला.

या आख्यायिकेच्या दुसऱ्या एका रूपात लुब्धक हा शिकारी म्हणजे व्याध होता. दिवसभर शिकार न मिळाल्यानं त्याला उपवास घडला. रात्र पडल्यावर त्याला हरिणांची एक जोडी दिसली. लुब्धक त्यांना मारणार, तेवढ्यात हरिणांनी घरी जाण्याची आणि आपल्या पाडसांना शेवटचं पाहण्याची विनंती केली. लुब्धकानं परवानगी दिली, हरिणं पाडसांना भेटून लुब्धकाचं पोट भरण्यासाठी परत आली. त्यांचा प्रमाणिकपणा पाहून लुब्धकानं त्यांना जीवदान द्यायचं ठरवलं. तेव्हा मध्यरात्र झाली होती. हरणं परत येईपर्यंतच्या काळात लुब्धक बेलाच्या एका झाडावर बसून पानं खाली टाकत राहिला होता. त्याचा उपवास, नकळत केलेली शिवाची उपासना आणि त्यानं हरणांना दिलेलं जीवदान तसंच हरिणांचा प्रामाणिकपणा यामुळे शंकर प्रसन्न झाले.

त्यांनी लुब्धकासोबतच हरिणांनाही आकाशात ताऱ्याच्या रुपात स्थान दिलं- तेच मृग नक्षत्र आणि व्याध तारा आहेत, असं मानलं जातं.

जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत त्यांच्यासाठी आणि जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठी देखील ती खूप महत्वाची आहे. जे लोक कौटुंबिक परिस्थितीत आहेत ते महाशिवरात्रीला शिवाच्या विवाहाचा उत्सव म्हणून पाहतात. महत्वाकांक्षी लोक ह्या दिवसाला शिवाने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळविल्याचा दिवस म्हणून पाहतात.

महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व
पौराणिक कथांव्यतिरिक्त योग परंपरेमध्ये या दिवसाला आणि या रात्रीला इतके महत्त्व दिले जाते, याचे कारण ही रात्र साधकाला उच्च अध्यात्मिक शक्यता उपलब्ध करून देते.

शिवरात्री – महिन्यातली सर्वात काळोखी रात्र
शिवरात्री हा महिन्यातला सर्वात काळोखा दिवस आहे. दर महिन्याला शिवरात्री साजरी करणे, आणि खासकरून महाशिवरात्री साजरी करणे, जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे वाटते. कोणतेही तार्किक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल. पण “शिव” या शब्दाचा अर्थ “जे नाही ते” असा होतो. “जे आहे,” ते अस्तित्व आणि निर्मिती आहे. “जे नाही”, ते शिव आहे. “जे नाही” म्हणजे, जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिले, जर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे असेल, तर तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल. जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असेल, तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे.

महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व?
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.

महाशिवरात्रीची आख्यायिका काय आहे?
महाशिवरात्री या नावावरुन आपल्याला बरंच काही समजते. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व देखील आहे. सर्वात आधी जाणून घेऊया की, महाशिवरात्री कधीपासून साजरी केली जाते. त्याची एक आख्यायिका सांगितले जाते. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री असे सांगितले जाते. काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ असे देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती. अशी देखील आख्यायिका पुराणांमध्ये सांगितली जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!