रावेरात महाविकासची राजकीय खेळी : माजी आमदार अरुण पाटलांचा पराभव
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा: जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे पुरस्कृत उमेदवार रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता. परंतू मतमोजणीच्या निकालानंतर जनाबाई महाजन यांचा विजय झाल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामामुळे सर्वच जण चकित झाले आहेत. जनाबाई गोंडू महाजन यांनी पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. परंतू मतदानाच्या आदल्या दिवशी जनाबाई गोंडू महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी अचानक फिल्डींग लावायला सुरुवात केली. शेवटी जाहीर पाठिंब्यानंतरही जनाबाई महाजन यांचा विजय आल्यामुळे तालुक्यातील राजकारणात भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो मतदार संघात जनाबाई गोडू महाजन यांची उमेदवारी खडसे व आ.चौधरी गटातून होती. तसेच माजी आ. अरुण पांडुरंग पाटील यांना भाजपाच्या गटाने पाठिंबा दिल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. मात्र भाजप पुरस्कृत झाल्यानेच पाटलांचा पद्धशिर गेम झाल्याचे दिसत आहे.
माघारीच्या चित्रानंतर जनाबाई गोंडू महाजन यांनी अरुण पाटील यांना जाहिर पाठिंबा दिला होता. तसेच गेल्या १० दिवसांपासुन महाजन हे पाटील यांच्या सोबत होते. परंतु अचानक मतदानाच्या दिवशी वातावरण बदलल्याने माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाची चांगलीच घालमेल झाली. माजी आ.अरुण पाटील यांच्या गटाने ३२ मतांचा दावा केला होता. तर महाजन गटाने देखील अंतर्गत निवडुन येण्याचा दावा केला होता. परंतू निकालाअखेर जनाबाई गोंडू महाजन यांनी अवघ्या एका मताने विजयी झाल्या. यानिमित्ताने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक पॉलिटिकल ड्रामा रावेरमध्ये खेळला गेल्याचे दिसून आले.