” अफू ” विरोधात मोठी कारवाई, तब्बल १३ कोटींची “अफू” ची रोपे जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बेकायदेशीरपद्धतीने करण्यात आलेल्या अफूच्या शेतीवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १२ कोटी ६१ लाखांची रोपे जप्त केली. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात असून संतोष मधुकर सानप (वय ४९, रा. अंढेरा, बुलढाणा) याच्याविरोधात गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुलढाणा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंढारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली आहे.
कोणालाही संशय येणार नाही, अशी तजवीज करत शेतकरी संतोष सानप याने ही अफूची रोपं शेताच्या मधोमध लावली होती. कोणाला समजणार नाही याची तो काळजी घेत होता. परंतु खबऱ्याला याची माहिती मिळताच, त्याने बुलढाणा पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी या संदर्भात चौकशी साठी
सानप यांच्या शेतात २१ फेब्रुवारी रोजी रात्री पाहणी केली. त्यांना वाटले थोडे फार अफूची रोपे असतील परंतु तब्बल १६ गुंठे शेतात सानप याने अफूची लागवड केली असल्याचे पाहून पोलिसही चक्रावले.
पोलिसांची अधिक कुमक बोलावत अफूची रोप जप्त केली. रात्र असताना कारवाईला अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी जनरेटर उपलब्ध करून घेत शेत परिसरात लाईटची व्यवस्था केली. रोपांचे वजन मोजण्यासाठी काटा सुद्धा आणला. काल रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली कारवाई आज सकाळी आठवाजेपर्यंत सुरू राहिली.
शेतातून पोलिसांनी तब्बल १५ क्विंटल ७२ किलो (१ हजार ५७२ किलो) वजनाची अफूची रोप जप्त केली. यात नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.