रावेर तालुक्यातील अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई, ७४० किलो गोवंश मांस जप्त
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैध गोवंश कत्तलखान्यावर रावेर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येऊन कत्तलखाना उध्वस्त करण्यात आला. घटनास्थळावरून सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ७४० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त करण्यात आली असून आठ जणांपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार जण मात्र पळून गेले.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात मरीमाता मंदिराच्या पाठी मागील भागात सलीम उस्मान कुरेशी याच्या घरासमोर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोना कल्पेश आमोदकर, पोकॉ श्रीकांत चव्हाण, पोकॉ प्रमोद पाटील, पोकॉ सुकेश तडवी, यांनी रसलपूर येथे छापा टाकला असता, येथे आठ जण एका मोकळ्या जागेत गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी घटनास्थळावर आठही जणांवर कारवाई करत त्यातील शेख वसीम शेख कय्युम कुरेशी. (वय २५ वर्ष), शेख शकील शेख कलीम कुरेशी (वय २४ वर्ष ), शेख सलीम शेख उस्मान कुरेशी (वय ६० वर्ष) आणि शेख अनिस शेख अय्युब कुरेशी (वय ३२ वर्ष ), (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, रावेर ) या चौघांना ताब्यात घेतले मात्र बाकी शेख नुरअहमद शेख सलीम कुरेशी, शेख फारुख शेख अय्युम कुरेशी, शेख समीर शेख कय्युम कुरेशी आणि शेख फरीद शेख शब्बीर कुरेशी (सर्व रा. कुरेशी वाडा, रसलपूर. ता. रावेर ) हे चार जण तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले.
रावेर पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळावरून १ लाख ४८ रुपये किंमतीचे अंदाजे ७४० किलो गोवंश मांस आणि चार जनावरांची कातडी, १ हजार २०० रुपये किंमतीच्या चार कुऱ्हाडी आणि ८०० रुपये किंमतीचे चार सुरे जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सील करण्यात आले. जप्त केलेले मांस रावेर नगरपालिकेच्या मदतीने कचरा डेपोत नष्ट करण्यात आले. या संदर्भात रावेर पोलिस स्टेशनला आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे.