मकर संक्रांत : जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मकर संक्रांतीला हिंदु धर्मात
खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. मात्र यंदाची मकर संक्रांत आज १४ जानेवारी रोजी साजरी केली जात आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल, सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. तसेच या दिवशी सूर्यदेवाची पूजा-आराधना केली जाते, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यांत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
मकर संक्रांतीचा पुण्य काळ
या वर्षी मकर संक्रांत आज १४ जानेवारी मंगळवार रोजी येत असून या दिवशी सूर्य सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. तसेच महापुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल.
- मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो.
- या दिवशी भारतातील अनेक तीर्थस्थानांवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
- तसेच या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचेदेखील विशेष महत्त्व आहे.
- संक्रांतीच्या शुभ दिवशी गरजू लोकांना काळे तीळ, चादर, गूळ, तूप या वस्तू दान करण्याचे महत्त्व आहे.
मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले, त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते.