आधार व्हेरिफिकेशन व हयातीच्या दाखल्याची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून द्या – आ. अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना
यावल/ रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर – यावल तालुक्यातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले (Life Certificate) या आवश्यक कागदपत्रांच्या सुविधेसाठी गाव पातळीवरच सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
सध्या या दोन्ही सेवा मुख्यत्वे तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार तेथे जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. विशेषतः वृद्ध, अपंग आणि अशक्त नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी रावेर तहसील कार्यालयात व्हिडिओ कॉलद्वारे विविध लाभार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे या सुविधा गावपातळीवर – जसे की ग्रामपंचायत कार्यालय, CSC केंद्रे किंवा मोबाईल कॅम्पद्वारे – सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच, या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून अधिकाधिक नागरिक या सेवांचा लाभ घेऊ शकतील, अशीही सूचना त्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.