Congress President : कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे !
नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे विजयी झाले आहेत. २४ वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत खर्गे यांनी शशी थरुर यांचा पराभव केला आहे. खर्गे यांना ९० टक्के मते मिळाली आहेत. थरुर यांनी खर्गे यांचे अभिनदन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभर चर्चेत असलेली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर शशी थरूर यांनी ट्वीट करून मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत ४०० हून जास्त मतं बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन यांचा वरचष्मा होता. खर्गे यांना गांधी घराण्याचा पाठिंबा आहे. यासह त्यांच्या नामांकनावेळी पक्षातील सर्व बडे नेते मंडळीसुद्धा उपस्थित होते. अशा स्थितीत निवडणुकीत खर्गे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाच आता ते अधिकृतरीत्या काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.