मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये; आक्रमक आंदोलनाचा इशारा !
नाशिक (प्रतिनिधी)। मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर सरकारला 3 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. भूमिका स्पष्ट करा नाहीतर आंदोलन अटळ आहे अशी आक्रमक भूमिका क्रांती मोर्चा समनव्याकांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. मराठा आरक्षणप्रकरणी आता घटनात्मक खंडपीठ सुनावणी पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.