केंद्र सरकारी कार्यालयात मराठीची सक्ती, राज्य सरकारचे आदेश
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंद्र सरकारी कार्यालये, रेल्वे, बँका, विमा कंपन्यांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य असल्याचे स्पष्ट करणारे नव्याने परिपत्रक मराठी भाषा विभागाने सोमवारी काढले आहे.
या बाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काढले असून त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर या कार्यालयांमध्ये होतो की नाही याचा आढावादेखील घेतला जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
मराठीचा वापर आपल्या कार्यालयांमध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार होत आहे की नाही याबाबतचे स्वयंघोषणा पत्र सर्व केंद्र सरकारी कार्यालयांकडून घ्यावीत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने दिले आहेत. हे स्वयंघोषणापत्र प्रत्येक केंद्र सरकारी कार्यालयात दर्शनी भागात लावावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
तसेच इंग्रजी आणि हिंदीबरोबरच मराठी भाषेचा वापर त्रिभाषा सूत्रानुसार या कार्यालयांनी कामकाजामध्ये करणे अनिवार्य असल्याची आठवण करून देत या संबंधी ५ डिसेंबर २०१७ रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन काटेकोर होणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
त्याच प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत केंद्र सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात आणि मराठीच्या वापराबाबत राज्य सरकारचे नियम काय आहेत आणि त्यांची अंमलबजावणी याबाबत चर्चा करावी, असे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले असून केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये नियमानुसार मराठीचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आल्या की लगेच संबंधित कार्यालयांकडून त्यांचे निराकरण करवून घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले
काय म्हटले आहे परिपत्रकात?
राज्यातील जनतेशी केल्या जाणाऱ्या सर्व पत्रव्यवहारांमध्ये, संदेश वहनांमध्ये, मौखिक, लिखित व्यवहार आणि संवादांमध्ये मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचा वापर करावा. सर्वसामान्यांच्या माहितीसाठी प्रदर्शित करावयाच्या सर्व सूचना, सूचना फलक, जाहीर सूचना, जाहिराती आणि नावांच्या पाट्यांमध्ये मराठी भाषेचा वापर करावा.
सर्व प्रपत्रे, नमुने, आवेदन पत्रे, प्रवासी तिकिटे, 3 बँका व टपाल पावत्या आणि जनतेशी संबंधित सर्व दस्तऐवज यामध्ये मराठी भाषेचा वापर करावा. जनतेसाठीच्या सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवांमध्ये मराठीचा वापर करावाच लागेल.
सर्व रेल्वे, मेट्रो, मोनो रेल व विमाने यांचे आगमन आणि निर्गमन निर्देशफलक, वेळापत्रके, रेल्वेची नामफलके, रेल्वे डबा किंवा यान क्रमांक, स्थानके, वाहनतळे, बंदरे व विमानतळांची नावे यात मराठीचा वापर अनिवार्य. विविध पदभरतीसाठीच्या सर्व लेखी व मौखिक परीक्षांमध्ये इंग्रजी आणि हिंदीसह मराठी भाषा अनिवार्य आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा