विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू, माहेरच्यांचा सासरच्या मंडळींवर आक्षेप
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील भुसावळ पासून जवळच असलेल्या वांजोळा या गावी एका २७ वर्षीय तरुण विवाहिला विजेचा जबर शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तरुणीच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर आक्षेप नोंदविला आहे.
दीपाली चेतन तायडे वय २७ वर्ष. ही विवाहित तरुणी घरा जवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागून जमिनीवर पडली होती. त्यावेळी तिला भुसावळ येथील खाजगी हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दिपाली यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर मृतदेह ट्रॉमा केअर सेंटर येथे शवविच्छेदना साठी दाखल करण्यात आला. यावेळी सासरच्या मंडळींवर दिपालीच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांकडे आक्षेप नोंदवले. याबाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपाली हिच्या पश्चात पती, एक मुलगी असा परिवार आहे.


