मोठी बातमी : नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मागील बारा दिवसांपासून दोघेही तुरुंगात आहेत. दोघांवर राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. रवी राणा सध्या तळोजा कारागृहात तर नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत. न्यायालयाने दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद 30 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.
सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी न्यायालयात दोघांना जामीन न देण्याची जोरदार मागणी केली होती. राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले. घरत यांनी सांगितले होते की, राणांविरोधात कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला होता. पण न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून दोघांना जामीन मंजूर केला.