नाथाभाऊंची विधान परिषदेत विजयी पताका !
मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या विधानपरिषद निवडणुकीत २७ मते घेऊन नाथाभाऊंची विधीमंडळात एंट्री करत विजय संपादन केला आहे.
विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार्या जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर होताच यासाठी कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. यातच १० जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा फटका बसल्याने महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला. खरं तर बहुतेक वेळेस या निवडणुका बिनविरोध होत असतात. तथापि, भाजपने आपला पाचवा उमेदवार मैदानात उतारल्याने चुरस वाढली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथराव खडसे यांना तिकिट मिळाले. आकड्यांचा खेळ पाहता भाजपचे चार, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र दहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली. यात भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारात काटे की टक्कर होणार असल्याचे संकेत मिळाले. तथापि, याऐवजी एकनाथराव खडसे यांचा गेम करण्याची रणनिती समोर आली. भाजप नेत्यांनी सर्व पक्षांमधील खडसे विरोधकांशी हातमिळवणी करण्याची रणनिती आखली. यामुळे राष्ट्रवादी आणि स्वत: एकनाथराव खडसे यांनीही आपल्या परीने मोर्चेबांधणी केली.