MLC Election : नाथाभाऊंच्या आमदारकीसाठी अजितदादा डाव टाकणार, राष्ट्रवादीचे फासे चालणार की भाजप चमत्कार घडविणार ?
मुंबई/जळगाव, मंडे टू मंडे न्युज विशेष वृतांत : विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला जेमतेम ४८ तास शिल्लक असताना शनिवारी दिवसभर राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत होत्या. बहुजन विकास आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पक्षाची सात मते आणि अपक्षांची मते आपल्याकडे वळवण्याच्या चमत्कारावर विधान परिषदेच्या निवडणुकीचे गणित अवलंबून आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणूक होणारच हे निश्चित झाले होते. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नाकावर टिच्चून भाजपने आपला उमेदवार निवडून आणला आणि संजय पवारांचा गेम केला. राज्यसभेतील विजयामुळे भाजप पुन्हा जोशात असून जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. खडसे विधान मंडळात येण्यामागे तीन महत्वाची कारणे सध्या चर्चेत आहेत. एक म्हणजे खडसेंचे पुनर्वसन, दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आणि तिसरे म्हणजे महाविकास आघाडीला बळ मिळेल. सुरुवातीला खडसे निवडूनच येणार असे चित्र स्पष्ट दिसत असताना त्यातच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अतिरिक्त मतांची आवश्यकता भासणार आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला गारद केल्यानंतर भाजपने आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि पर्यायाने एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा लावल्याचे भाजपच्या गोटातून खाजगीत सांगण्यात येत आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठीची सारी सूत्र त्यांचे विश्वासु सहकारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली असल्याचेही सांगण्यात येत आहे. एकनाथराव खडसे यांना भाजपकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवून देण्याची शक्यता आधी वर्तविण्यात येत होती. मात्र आता पक्षाची दोन हक्काची मते कमी झाली आहेत. रामराजे निंबाळकर हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. दुसरीकडे खडसेंचा विषय राष्ट्रवादीसाठी आता प्रतिष्ठेचा झाला आहे. यामुळे मतांचे गणित व खडसेंची भाजपची मते खेचून आपल्या पारड्यात टाकण्याची रणनीती हे विजयासाठी महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, भाजपात खडसेंना माननारा एक गट असून तो छुप्या पध्दतीने मदत करेल, असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे. पण या पाडापाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीचाच घात होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीतीचा ‘रिमोट’ स्वत:कडे घेतला आहे. त्यामुळे खडसेंना पाडण्यासाठी छुपे डाव टाकण्याच्या तयारीतील फडणवीसांवर प्रतिडाव टाकून पवार हे खडसेंना विधान परिषदेत पाठवण्याच्या तयारीत असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून माहीती मिळत आहे.
पुढच्या राजकारणाची बांधणी करीत, अजित पवार हे एरवी पक्षापलीकडे जाऊन आमदारांना ‘बळ’ देत असल्याचा दिसून येते. अशांना गळाला लावून पवार हे आणखी एक डाव टाकू शकतात. नाईक-निंबाळकरांना भाजपमधून काही मदत होण्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये पाचव्या जागेसाठी टक्कर होत असली; तरीही फडणवीसांच्या डोक्यात खडसेंचा ‘गेम’ ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचे गणित बिघडून कोणाला कसा फटका बसेल, याची हमी उरलेली नाही. मात्र, खडसेंना धोका झाल्यास पर्यायाने तो राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी धक्का मानला जाईल. हा धोका टाळण्याच्या हेतुने पवार यांनी विधान परिषदेची सारी सूत्रे आपल्याकडे घेऊन नवी रणनीती तयार केल्याचे समजते. ज्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे ‘सेफ’ असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच खडसेंच्या कोट्यात आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसह प्रमुख आमदारांची मते देण्याची खेळी पवार यांची आहे. भरवश्याच्या आमदारांची मते खडसेंच्या पारड्यात देऊन खडसेंची आमदारकी पक्की करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. भाजपसह त्यांच्या साथीतील अपक्ष आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून पवार हे नेहमीच मदत करतात, त्याच्या परतफेडीपोटी दोन-चार आमदार पवारांचा शब्द खाली पडू देणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.त्यामुळे खडसेंच्या पराभवासाठी महाविकास आघाडी त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मतांवर डोळा ठेवून डाव रचलेल्या फडणवीसांवर पवारांच्या खेळ्या भारी पडण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने तर या निवडणुकीतील चुरस अधिकच वाढवली आहे. या निवडणुकीत चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सर्व दिसेलच. ११ उमेदवारांपैकी एक उमेदवार पराभूत होईल. त्यामुळे चमत्कार तर घडणार आहेच. आता चमत्कार कोणाबाबत घडतोय ते सोमवारी महाराष्ट्र बघेलच. सर्व जागा निवडणून आणण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. २६चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल, असे अजित पवार म्हणाले. संबंधित आमदाराने कोणाला मतदान करायचे हे राष्ट्रवादीत फक्त तिघांनाच माहिती असणार आहे. यात तो आमदार, अजित पवार आणि जयंत पाटील यांचाच समावेश असेल. त्यामुळे राष्ट्रवादी कशा पद्धतीने मतदान करेल हे भाजपला तर कळणार नाहीच पण महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही कळणार नाही. याबाबत अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचे धोरण निश्चित झाले. राष्ट्रवादीचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. आता यातील दोघांना मतदान करण्यास परवानगी नसल्याने एकूण आमदार ५१ उरले आहेत. उमेदवाराला विजयासाठी २६ मते हवी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघे जण रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला आता आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी एका मताची गरज पडणार आहे.
त्याचवेळी भाजप नेत्यांच्या कुरघोडीचा खेळ जवळून पाहिलेले खडसेही काही कमी नाहीत. भाजप सोडल्यानंतरही त्या पक्षातील जुन्या समर्थकांशी अजूनही संबंध जोडून असलेले खडेसेही भाजपची एक-दोन मते फोडू शकतात. भाजपमधील काही आमदारांना फोडण्याची जबाबदारी खडसे आणि नाईक-निंबाळकरांकडे अधिकृतपणे दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे खडसेंना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपासून अजित पवार, जयंत पाटील आणि प्रमुख नेते हालचाली करीत असतानाही, खडसे स्वत:च्या पातळीवरही विजयासाठी झटत आहेत. राज्यात देखील खडसेंच्या मागे मोठा बॅकअप असल्याचे म्हटले जाते. खडसेंना पंकजा मुंडे यांच्या समर्थक आमदारांचा देखील पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. सध्यातरी सर्व चर्चाच असल्या तरी खडसेंना रविवारी म्हणजे आजच्या रात्री पर्यंत सर्व खेळी खेळाव्या लागणार आहे. आपल्या पक्षाचा असो, मित्र पक्षाचा असो किंवा विरोधी भाजपचा आमदार असो, त्यांच्याशी बोलून आपले हक्काचे मत निश्चित करणे खडसेंना आवश्यक आहे.