मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
बीड, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात परळी जिल्हा न्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात एकाही सुनावणीला हजर न राहिल्या प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
२००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
यापूर्वी जानेवारी महिन्यातही बीड जिल्हा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांकडून राज ठाकरे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, अलीकडच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राज ठाकरे यांच्याविरोधात काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटला महत्त्व प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयाकडून सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून घेणार का आणखी काही कायदेशीर मार्ग काढणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.