मंडे टू मंडे इम्पॅक्ट : साई समर्थ कॉलनीतील सांडपाणी समस्येची प्रशासनाकडून दखल
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | – येथील साई समर्थ कॉलनी परिसरातील सांडपाण्याच्या गंभीर समस्येबाबत मंडे टु मंडे न्युज ने प्रसिद्धbकेलेल्या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. या संदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नशिराबाद येथील साई समर्थ कॉलनीतील शिवसह्याद्री अपार्टमेंटमधून निचरा होणारे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले होते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रश्न प्रलंबित होता. मात्र ही समस्या प्रकाशझोतात आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल करत पाहणी केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाइपलाइन टाकून ते सांडपाणी दुसऱ्या गटारीपर्यंत वळविण्यात येईल, असे सांगितले. तसेच या कामाला येत्या सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तातडीने कारवाई सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाचे आभार मानत, ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकरणी प्रसिद्ध झालेली बातमी ही खऱ्या अर्थाने “मंडे टू मंडे इम्पॅक्ट” ठरली असून त्यामुळेच प्रशासनाला त्वरित दखल घ्यावी लागल्याची चर्चा मात्र परिसरात रंगली आहे.


