केळी आणि कापूस पीक उत्पादकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार – खासदार रक्षा खडसे
जळगाव (प्रतिनिधी)। मागील वर्षी काढलेल्या केळी व कापूस पीक विम्याचे नुकसान भरपाई चे पैसे ज्या शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी खासदार रक्षाताई खडसे यांची भेट घेतली होती, यानंतर खासदार खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या अन्यायाची माहिती दिली व १ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, विमा कंपनीचे अधिकारी, बँकेचे अधिकारी आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
जुलै 2020 मध्ये संपलेल्या केळी व कापूस पीक विमा योजनेत बँकिंग कडून त्रुटी राहिल्याने जिल्ह्यातील शेकडो केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची नुकसानभरपाई मिळू शकणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत संबंधित बँकेशी संपर्क साधून केळी व कापूस पीक विमा काढला होता. बँकेच्या विम्याचा हप्ता देखील बँकेकडे भरणा झाला होता. परंतु या शेतकऱ्यांची नावे आणि माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आणि विमा कंपनीच्या पोर्टलवर अपलोड न केल्याने या शेतकऱ्यांना केळी व कापूस पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही असे बँकांकडून सांगण्यात येत आहे यामध्ये बँकेकडून वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे केले जात आहेत.
खासदार खडसे यांनी व्यक्त केला संताप–
आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक बोलावली असता विमा कंपनीचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहिले नाही खासदार खडसे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले, तसेच कृषी आयुक्त यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विमा कंपनीचे अधिकारी करत असलेल्या अक्षम्य हलगर्जीपणाबाबत तक्रार केली. विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी त्वरीत नोटीस काढून पुढील आठवड्यात बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टी, वादळी वारे, यामुळे हतबल झालेल्या केळी व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांचे कोरोनाच्या संकटामुळे कंबरडे मोडले असून त्यात विमा कंपनी आणि बँकेच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होत आहे.
कोणत्याही परिस्थितीत केळी व कापूस पीक उत्पादकांचे नुकसान होऊ देणार नाही खासदार रक्षा खडसे यांची ग्वाही
बँक आणि विमा कंपनीच्या घोळामध्ये शेतकरी भरडला जाऊ नये. कोणीही केळी व कापूस पीक उत्पादक शेतकरी पीकविम्याच्या नुकसानभरपाई पासून वंचित राहू देणार नाही याची मी खात्री देते. विमा कंपनी किंवा बँक कोणाचीही चूक असेल तरी त्यांना संबंधित सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यावी लागेल असे खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या याबाबतीत मी केंद्रीय कृषी मंत्रालय कडे सुद्धा तक्रार करणार आहे याची पुष्टी देखील त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा