एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, …तर वाहनचालकांना थेट घरचा रस्ता दाखवला जाणार
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क : एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी गाडी चालवताना चालक फोनवर बोलताना आढळल्यास त्या चालकावर थेट कारवाई होणार, एसटी बस चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटी चालकांना गाडी चालवताना मोबाइल वापरण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. नवा नियम लागू करण्यात आला असून एसटी महामंडळ अशा वाहनचालकांवर आता थेट निलंबनाची कारवाई करणार आहे. याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मेळणार आहे. कारण दररोज लाखो नागरीक दररोज एसटीने प्रवास करतात. एसटीला प्रवाशांकडून प्रचंड महसूलही मिळतो. पण ज्या एसटीने प्रवासी प्रवास करतात त्यांना पैसे देवूनही जीवाची भीती वाटत असेल, तर अशा प्रवासाला अर्थ नाही. प्रवासी पैसे देवून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना सुखरुप असा प्रवास आहे. काही चालकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलल्यामुळे अशाप्रकारच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळाकडून याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे. “एसटी बस चालवत असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानूसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत”, असं एसटी महामंडळाने प्रसिद्धी पत्रकारत म्हटलंय.
“एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना भ्रमणध्वनीवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, भ्रमणध्वनीवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक आणि प्रवाशांचाद्ष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते”, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
“याबदृल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत”, अशी माहिती एसटी महामंडळाकडून प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.