Video;निमखेडीत दगडफेक प्रकरणात परिस्थिती नियंत्रणात; ५७ जणांवर गुन्हे दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, मुक्ताईनगर ।
मुक्ताईनगर-बोदवड मार्गावर असणार्या निमखेडी खुर्द या गावात रात्रीच्या सुमारात अज्ञात लोकांनी महापुरूषाचा पुतळा स्थापीत केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी संबंधीत पुतळा काढण्याचे काम सुरू केल्यानंतर काही काळ तणाव पसरला. यातच काही जणांनी दगडफेक सुरू केली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील एका कर्मचार्याच्या छातीला वीट लागल्याने त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, दगडफेकीमुळे वातावरण चिघळत असल्याचे पाहून तातडीने अतिरिक्त कुमक पाचारण करण्यात आली. यानंतर पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले. दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निमखेडी खुर्द गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून विना परवाना पुतळ्याबाबत नियम समजून सांगितले. यानंतर कडक बंदोबस्तात पुतळा काढण्यात आला.
निमखेडी खुर्द गावातील काही जणांनी केलेल्या दगडफेकीची चौकशी करण्यात आली असून
पोलीस कॉन्स्टेबल संजय भाऊराव पाटील यांच्या फिर्यादीवरून दीपक बाबूलाल डहाके, गजानन दिनकर डहाके,अतुल विलास डहाके, मंगेश रामकृष्ण मराठे, सतीश सुधाकर डहाके ,देवेंद्र रमेश डहाके, कैलास विठ्ठल डहाके, अरविंद भीमराव लोमटे, मंगल रवींद्र फरडले ,अशा एकूण नऊ आरोपींना अटक असून एकूण 57 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत असून ही प्रक्रिया सुरू झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आजच्या घटनेत गावातील एका वृध्दाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर डॉ. मुंढे म्हणाले की, आज गावात एका वृध्दाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निमखेडी खुर्द येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही डॉ. मुंढे यांनी नमूद केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश साळुंके करीत आहेत.