गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त : मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील माणेगाव शिवारातील नदीच्या बेटाजवळ बेकायदेशीर सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी मुक्ताईनगर पोलिसांनी उद्ध्वस्त करून ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तालुक्यातील माणेगाव येथे बेकायदेशीररित्या दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार माणेगाव शिवारातील नदीमधील बेटाजवळ पोलिसांनी गुरुवार १० मार्च रोजी सकाळी ९ वाजता धाड टाकली. याठिकाणी दारू तयार करण्याचे कच्चे व पक्के रसायन पूर्णपणे नष्ट करण्यात आले. तर एकूण ५९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये संशयित आरोपी शांताराम जयराम बेलदार रा.माणेगाव ता. मुक्ताईनगर यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शांताराम बेलदार यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक जाधव करीत आहे.