गटविकास अधिकारी व अन्य ५ जणांवर फौजदारी गुन्हाचा अर्ज दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी: मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे कोर्हाळा गावी ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची फसवणूक केली. म्हणून मुक्ताईनगर पंचायत समिती चे विद्यमान गट विकास अधिकारी संतोष रघुनाथ नागतीलक आणि अन्य पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर चे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली असून याप्रकरणातील सदरील वकील याच्याकडे याप्रकरणी फोन वरून शहानिशा करण्यासाठी विचारणा केली असता त्यांच्या कडून सांगण्यात आले सदरील वृत्त खरे असून कोर्टात दाखल करण्यात आले आहे व त्यांच्या नकला आपल्याला मिळून जातील. या प्रकरणी सखोल चौकशी केली असता मे.कोर्टामधील नकलाचे वाचन केले असता मा. न्यायालयात फिर्यादीकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा विनंती अर्ज दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात मे.कोर्टात गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाव्यारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या मौजे कोर्हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार १)टीसीएल पावडर खरेदी,२)क्लोरीन डोस मशीन बसवणे आणि ३)जिल्हा परिषदेच्या शाळेस संरक्षक भिंत बांधणे अशा कामांत भरती वरती १ लाख ७४ हजार ९६३ रुपये, ३८ हजार ५०० रुपये आणि २ लाख रुपये असे मिळून ४ लाख १३ हजार ४०६ रुपयांचा भ्रष्टाचार करून सरकारी मालमत्तेचा स्वतः व सामुहिक लाभा साठी अपहार केला असून सदरील आरोपी १ ते ६ यांनी फौजदारी गुन्हा केला असल्याचे सदरील अर्जात नमूद केले असून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयास याप्रकरणी लेखी पत्र देऊन फिर्यादी उपोषणास बसले परंतु वरिष्ठांनी याप्रकरणी कोणताही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा वरील आरोपी वरती दाखल केला नाही असेही या अर्जात नमूद करण्यात आले आहे. म्हणून याप्रकरणी आरोपीं विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही त्यामुळे नाईलाजास्तव सदरील फिर्याद मे. कोर्टात दाखल केली असून सदर प्रकरणी सी.आर.पी.कलम १५६(३) प्रमाणे मुक्ताईनगर पोलिसांना आरोपी क्रमांक १ ते ६ यांच्या विरुद्ध भा.द.वि.कलम- १६६,१६७,४२०,४०९, ४६८,४७१, १२० ब सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अशी विनंती मे. कोर्टास फिर्यादी यांनी केली आहे.
सदर खटल्या मध्ये आरोपी क्र. १) संतोष रघुनाथ नागटिळक २) योगेश शिवाजी पवार ३) एस एस सुरवाडे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मुक्ताईनगर ४)दिगंबर रामप्रसाद लोखंडे जिल्हा परिषद जळगाव ५)प्रवीण प्रल्हाद कांडेलकर कोर्हाळा तालुका मुक्ताईनगर आणि बी.सी./बळीराम चान्गो महाजन रा. कुर्हा काकोडा तालुका मुक्ताईनगर अशा सहा जणांच्या विरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज क्रमांक ४०/२०२२ नुसार फिर्यादी संतोष त्रंबक कोळी यांचे तक्रारीनुसार फौजदारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदरील फौजदारी अर्ज प्रकरणात पुढील सुनावणी १ एप्रिल २०२२ ला असून यावेळी कोर्टात बचाव पक्षाकडून व फिर्यादी यांच्या कडून काय युक्तिवाद केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.