ब्रेकींग : मुक्ताईनगरात वातावरण तापलं; शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या (shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांच्या मुक्ताईनगरमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. यानंतर ठाकरे गटांकडून सभागृहात सभा घेण्याची तयारी करणार्या शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. येथिल राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
ज्या मैदानावर सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. तिथे महाआरतीचं आयोजन करण्यात आल्याचं सुषमा अंधारे यांच्या सभेला व महाआरतीला परवानगी नाकारण्यात आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली. यानंतर आज सकाळपासूनच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाप्रबोधन सभेच्या ठिकाणीच ठाण मांडले. काहीही झाले तरी सभा होणारच असल्याचा त्यांचा पवित्रा होता. तथापि, दुपारी सभेसाठी लागलेले व्यासपीठ आणि अन्य बाबी हटविण्यात आल्या. यानंतर संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकार्यांनी मुक्ताईनगर गाठले. त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांसह वार्तालाप केला.
यानंतर शहरातील गोदावरी मंगल कार्यालयातील हॉलमध्ये सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, पोलिसांनी याला देखील परवानगी नाकारली. याप्रसंगी शिवसैनिक आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दीक वाद देखील झाले. अखेर पाच वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा संघटन गजानन मालपुरे, जिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत व समाधान महाजन, ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर खैरनार, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे आदीं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात नेले. याप्रसंगी जोरदा घोषणाबाजी करण्यात आली. सर्वांना पोलीस स्थानकात नेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.