मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील दुकानांना लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी। काल रात्री मुक्ताईनगर शहरामध्ये मधोमध असणार्या परिवर्तन चौकाच्या लगतच दोन ते तीन दुकानांना अचानक आग लागली. या दुकानांमधून आगीचे लोळ उठतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पल चे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले.
दरम्यान, नागरिकांनी प्रयत्नांची शर्थ केल्यामुळे अग्निशमन पथकाची गाडी येण्यापूर्वीच आग आटोक्यात आली. तथापि, या आगीत सुमारे सहा ते सात लाख रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.नागेश मोहिते व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदतकार्य केले. यामुळे काही मिनिटांमध्ये आग आटोक्यात आली.
ही आग नेमकी कशामुळे लागली ? याची माहिती मिळाली नाही. तथापि, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आग लागल्याने परिसरात बराच वेळ गोंधळ उडाला होता.
मुक्ताईनगरला हवी अग्निशमन दलाची गाडी?
मुक्ताईनगर येथे यापूर्वी सुद्धा दोन-तीन वेळेस आगीच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आग लागल्यावर सावदा, वरणगाव, व आता बोदवड येथून गाडी मागवावी लागते त्यामुळे मुक्ताईनगर येथे सुद्धा अग्निशमन दलाची गाडी हवी अशी चर्चा नागरिकात आहे.