मुक्ताईनगर मध्ये साक्षरता रॅली ; सर्वांगीण साक्षरता काळाची गरज- प्राचार्य महाजन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने आणि साक्षरता पंधरवडा उपक्रमांतर्गत साक्षरता रॅली उत्साहात संपन्न झाली. साक्षरता रँलीच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन यांनी आजच्या काळात लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर नव्हे तर या शैक्षणिक साक्षरते सोबतच वित्तीय साक्षरता, संगणक साक्षरता व पर्यावरणपूरक साक्षरता ही काळाची गरज आहे, याची समाजात जनजागृती झालीच पाहिजे असे मत व्यक्त केले.
या साक्षरता रॅलीचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल पाटील, उपप्राचार्य राजेंद्र चौधरी, ग्रंथालयाचे अधीक्षक प्राध्यापक सरोदे व विद्यार्थी विकास महिला अधिकारी प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले.
साक्षरता रॅलीची महाविद्यालयापासून सुरवात करून परिवर्तन चौकातून बसस्थानक तसेच भाजी मंडई मार्गे पुनश्च महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. या साक्षरतेच्या रॅली दरम्यान एनएसएस स्वयंसेवकांनी शैक्षणिक, वित्तीय, संगणक आणि पर्यावरण साक्षरतेचे नारे दिले. उदाहरणार्थ ‘जब हर इंसान पढेगा…तब इंडिया आगे बढेगा..!’ असा शैक्षणिक साक्षरतेचा नारा दिला. वित्तीय साक्षरतेचा नारा देत असताना स्वयंसेवकांनी ‘मी वित्तीय साक्षर होणार हाय…टाटा-बाटा-बिर्ला बनणार हाय..!’ असे आकाशाला गवसणी घालणारे नारे दिले. ‘संगणकाशी संगत म्हणजे…ज्ञानाची आणि कार्याची गतिमानता होय…!’ असा उपदेशपूर्ण संगणक साक्षरतेचा नारा दिला. पर्यावरण साक्षरता मानवी जीवनाकरिता आवश्यक असल्याने ‘पर्यावरण का साथ रहेगा … तभी मानव आबाद रहेगा…!’ अशी जोश पूर्ण घोषणा देऊन मुक्ताईनगर शहरात जनजागृती केली.
साक्षरते रॅलीचे समन्वयक म्हणून एनएसएसचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर तर सहसमन्वयक म्हणून एनएसएस महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.ताहिरा मीर यांनी कार्य केले. या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.संजीव साळवे व एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजय डांगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
या रॅलीच्या प्रसंगी कृष्णकांत भारुडकर या विद्यार्थ्याने साक्षरता या विषयावर मनोगत व्यक्त करून अभिनंदनास पात्र ठरला. चंदन शिमरे, कृष्णकांत भारुडकर, प्रणव पवार, नंदन महाजन, राम पैलवान, सागर बोरोले, कल्पेश सपकाळे, भाग्यश्री भोळे, हेमांगी बानाईत, लुनेश्वरी चौधरी धनश्री नारखेडे व कुमारी प्रशांती इत्यादी एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रॅलीच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवला.