सावदा, बोदवड व मुक्ताईनगर बस स्थानकांचे नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी आ.चंद्रकांत पाटीलांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व सावदा या मुख्य बसस्थानकांची प्रचंड दुरावस्था झालेली असल्याने या ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधांची उणीव असल्याने या तीनही बस स्थानकांच्या नूतनीकरण व विस्तारीकरण करणेसाठी मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा अशा मागणीचे पत्र आज दि.10 जून 2021 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले व सदरील कामांबाबत सखोल चर्चा केली. तसेच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरील कामकाज मंदावल्यामुळे शहरातील बस डेपो च्या जागेतील नियोजित व्यापारी संकुलाच्या प्रस्तावाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली.
दिलेल्या पत्रात असे म्हटलेले आहे की, मतदार संघातील मुक्ताईनगर, बोदवड व सावदा असे तीन महत्वपूर्ण बसस्थानक असून त्यातील मुक्ताईनगर हे सर्वात मोठे बस स्थानक आहे. तसेच बोदवड हे देखील तालुका ठिकाण असल्याने व सावदा येथील देखील बस स्थानके मोठ्या स्वरुपाची आहेत. त्यामुळे येथे प्रवाशांची मोठी संख्या असते. त्यातच या बस स्थानकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याकरीता येथे प्रवाशांना अत्यावश्यक सेवा पुरविणे कामी तिघेही बस स्थानकाचे नुतनीकरण व विस्तारीकरण करणेकामी मंजुरी मिळून सदरील कामांना अंदाजित रु 3 कोटी चा निधी प्राप्त व्हावा अशी विनंती मागणी पत्रात करण्यात आली आहे.