आ. चंद्रकांत पाटील यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट : गुन्हा दाखल !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे विषयी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल आमदार चंद्रकांत पाटील यांचा अवमान होईल अशा पध्दतीत फेसबुक पोस्ट करून बदनामी करणार्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, शिवसेना शाखा प्रमुख गणेश अशोक टोंगे ( रा. मुक्ताईनगर) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, त्यांना काल रात्री सव्वाआठच्या सुमारास तालुक्यातील तालखेडा येथील दीपक गजानन वाघ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी करणारी पोस्ट टाकण्यात आल्याची माहिती दिली. याबाबत माहिती घेतली असता, अशोक गावंडे नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर हा प्रकार घडल्याचे दिसून आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा आणि कोहाळा येथील भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. या पक्ष प्रवेशा प्रसंगीच्या फोटोवर अशोक गावंडे याने डुकरे, ससे आदींसह अन्य प्राण्यांचे फोटो टाकून ते आपल्या प्रोफाईलवरून शेअर केल्याचे दिसून आले.
यासोबत आमदार पाटील यांच्या फोटोवरही हाच प्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच बदनामी झाल्याच्या कारणावरून गणेश अशोक टोंगे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या नुसार अशोक गावंडे ( रा. मुक्ताईनगर) याच्या विरोधात रात्री उशीरा भादंवि कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.