मुक्ताईनगरात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन : रोहिणी खडसेवर कारवाईची मागणी !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहचल्याचे दिसून येत आहे. मुक्ताईनगरातील सेना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या परस्परविरोधी गुन्ह्यांच्या प्रकारानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांना अटक करत कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
बोदवड नगरपंचायतीच्या मतदानादिवशी झालेल्या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकावरती गुन्हे दाखल केले आहेत. रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची भाषा केली आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझ्या जीवाला खडसे कुटुंबाकडून धोका असल्याचे आरोप केल्याने त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ आज मुक्ताईनगर येथील पोलिस स्टेशन आवारात हे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दिवशी मुक्ताईनगरचे शिवसेना तालुका प्रमुख छोेटू भोई आणि शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या अंगावर धावून गेल्याचे प्रकरण चांगलेच तापले.
यासर्व घडामोडीनंतर रवींद्रभैय्यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन मुक्ताईनगर मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्यासाठी बोदवड येथील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. तर लागलीच दुसर्या दिवशी समाधान महाजन आणि छोटू भोई यांनी देखील जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन अवैध धंदे हे खडसे समर्थकांचेच असल्याचा पलटवार केला. यानंतर परवा रात्री देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकार्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात दोन क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली फिर्याद एका महिलेने दिली असून यात शिवराज पाटील आणि अजय जैन (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सात-आठ जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही खडसे समर्थक आहेत. तर दुसर्या प्रकरणात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर हटकर (रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) आणि सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सुमारे १४-१५ जणांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून ते सर्व जण शिवसेनेचे समर्थक आहेत.
या प्रकरणानंतर काल रोहिणी खडसे यांनी महिलांचा अपमान होत असेल तर आम्ही आमदारांना चोपू असे वक्तव्य केले. यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला. यावर एकनाथराव खडसे यांनी या सर्व चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी आपल्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांचा संदर्भ असणार्या ऑडिओ क्लीप्स असल्याचा देखील दावा केला. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंडे टू मंडे न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलतांना खडसे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या ऑडिओ क्लीप्स वाजवून दाखविण्याचे प्रतिआव्हान दिले. यात आपल्याबाबत काही असेल तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असेही त्यांनी नमूद केले. तर रात्री उशीरा एकनाथराव खडसे यांनी मंडे टू मंडे न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या ऑडिओ क्लीप्समध्ये आमदारांचाच संदर्भ असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. दरम्यान, यानंतर आज शिवसेनेतर्फे रोहिणी खडसे यांना अटक करावी या मागणीसाठी तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलीस स्थानक परिसरात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदा घोषणाबाजी करून आंदोलन केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांना अटक करण्यात यावी. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल असा इशारा यात देण्यात आला आहे. यामुळे आता हे प्रकरण चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.