मुक्ताईनगरात खडसे व पाटील समर्थक पुन्हा आमने-सामने : राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बोदवड येथील निवडणुकीतील झालेल्या राड्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना वाद शांत होत नाही तोच मुक्ताईनगरात दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांमध्ये रात्री पुन्हा आमने सामने आले असून यातून शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर मारामारी व विनयभंगाचे आरोप केले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे यातून एकमेकांच्या विरूध्द क्रॉस कंप्लेंट देऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकारी पुन्हा आमने सामने आले यामुळे वातावरण तापले असून दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांविरोधात आरोप करण्यात आले असून राड्यानंतर दोन्हीकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्थानकात काल रात्री दोन परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिली फिर्याद अशी, ईश्वर हटकर (रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) आणि सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सुमारे १४-१५ जणांच्या विरूध्द तक्रार देण्यात आली आहे. यात या सर्व जणांनी या महिलेचा विनयभंग केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यासोबत संबंधीत महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून धमकावण्यात आल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार ईश्वर हटकर, सुनील पाटील आणि अन्य १४-१५ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, १४१, १४३, ५०४, ५०६, ५०७ आणि ( ३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल खताळ, उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे, पो. ना. अविनाश पाटील हे करत आहेत.
याप्रकरणी दुसर्या महिलेनेही मुक्ताईनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. यानुसार, यात शिवराज पाटील आणि अजय जैन (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सात-आठ जणांनी त्या महिलेचा विनयभंग करून मुलीस ढकलून देऊन पतीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवराज पाटील, अजय जैन आणि इतर अज्ञात सात-आठ जणांच्या विरूध्द भादंवि कलम ३५४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४१, १४३, ४२७ आदींसह कलम ३७ (१) आणि ( ३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीत यामुळे संघर्ष पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत असून या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील शिवराज पाटील आणि अजय जैन हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर ईश्वर हटकर आणि सुनील पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी असून ते आमदार चंद्रकांत पाटील यांचे खंदे समर्थक आहेत. यामुळे काल रात्रीच्या राड्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने उभे ठाकल्याचे दिसून आले हा संघर्श आगामी काळात अजून चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या बोदवड नगरपंचायतीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि मुक्ताईनगर तालुका प्रमुख छोटू भोई यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी केलेल्या गैरवर्तन केल्याच्या आरोप केल्याने जिल्ह्यातील वातावरण तापले असतांना याप्रसंगी त्यांनी मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. तर याच्या दुसर्याच दिवशी समाधान महाजन आणि छोटू भोई यांनी आपल्या सहकार्यांसह जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची मागणी केली. मुक्ताईनगरातील अवैध धंदे हे खडसे समर्थकांचेच असल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला होता.