मुक्ताईनगर बस स्थानकात अस्वच्छतेचा साम्राज्य : प्रवाशी परेशान !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून गेले कित्येक दिवसापासून स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांसोबतच कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत.
बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहांची अतिशय दैनावस्था पहायला मिळत असून नागरिकांकडून मोठी ओरड होत आहे. यात महिला आणि पुरूष या दोघांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रसाधनगृह आणि शौचालयात अतिशय घाण असल्यामुळे कुणालाही तेथे जातांना अनेकदा विचार करावा लागतो. रात्रीच्या वेळेस मुक्ताईनगर बस स्थानकांमधील स्ट्रीट लाईट पण बंद असल्यामुळे त्याचा फायदा गावातील अनेक लोक घेत असतात व तिथं दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
यामुळे महिला आणि विद्यार्थीनी यांना येथे असुरक्षित वाटते. या बाबींची अनेकदा तक्रारी करून देखील काहीही कार्यवाही होत नसल्याने प्रवासी त्रस्त झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस येथे दारूडे आणि अवैध धंदेवाले येत असल्याने महिलांना जीव मुठीत धरून उभे रहावे लागते. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा करवाई होत नसून डेपो मॅनेजर सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याची ओरड होत आहे.
तर रात्रीच्या वेळेस अनेकदा बर्याच बसेस बायपास वरून निघून जात असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढीस लागली आहे. आणि रात्रीच्या वेळेस बाहेरून येणाऱ्या बसेस बायपास निघून जातात व चौकामध्ये उभे असलेले प्रवासी यांना बस मिळत नाही तेव्हाच त्यांना पाचशे रुपये खर्च करून भुसावळ ट्रेन पकडण्यासाठी अर्जंट जावे लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. या सर्व प्रकाराची दखल घेऊन परिसरात स्वच्छता राखण्यात यावी अशी मागणी प्रवासी आणि कर्मचार्यांकडून होत आहे.