मुक्ताईनगरात सट्ट्याचे साम्राज्य पुन्हा सुरू : बातमी नंतर कारवाईच्या ४८ तासांच्या आतच खाकीचा धाक संपला ? आयजी पथकाच्या कारवाईच्या मागणीला आला जोर !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथील सट्टा-मटका या अवैध धंद्यांना ऊत आला असुन खत्री गल्लीतील सट्टा एकदम तेजीत सुरू आहे. एखाद दिवशी काही किरकोळ कारवाई झाल्यास मनाची समजूत म्हणून एक दोन दिवस सट्टा-मटका बंद ठेवला जातो, परंतु लगेच नवा ” भिडू नवा राज ” प्रमाणे खत्री गल्ली पुन्हा चालू होते. दिनांक 6 दिसेम्बर रोजी सुद्धा असाच प्रकार घडला आणि लगेच रात्री सट्टा तेजीत चालू झाला, ” मंडे टू मंडे न्युज” मध्ये बातमी झळकली व एलसीबी पथकाने येऊन काही सट्टा मटका घेणारे छोटे मासे यांना ताब्यात घेऊन कारवाई केली त्यांतर मुक्ताईनगर स्थानिक पोलिस प्रशासन यांनी सुद्धा चार जणांवर कारवाई केली, अशा एकूण सहा जणांवर मुंबई जुगार ॲक्ट 12 (अ )प्रमाणे 16 डिसेंम्बर 2021 रोजी सकाळी कारवाई करण्यात आली खरी मात्र पोलीस प्रशासनाच्या कारवाईला अजून ४८ तास होत नाही तो लागलीच दुसऱ्या दिवशी सट्टा तेजीत सुरू झाला,प्रशासन सट्टा मटका रोखण्यात अपयशी ठरले असून लागलीच दुसऱ्या दिवशी सट्टा तेजीत सुरू होणं यामागे वरपर्यंत हप्ते खोरीचे मायाजाल असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
“मुक्ताईनगर येथील सट्टा किंग खत्री गल्ली जोमात : सट्टा कींगांना मिळतेय खुले अभय !” या आशयाची बातमी “मंडे टू मंडे न्युज ” ने प्रसिद्ध केल्या नंतर पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून सट्टा साम्राटांची बैठक घेऊन सट्टा मटका काही दिवस बंद ठेवण्यासाठी तंबी दिली गेली मात्र, पुन्हा स्टिंग ऑपरेशन केले असता 17 डिसेंम्बर 2021 रोजी पुन्हा नव्याने नवा भिडू नवा राज प्रमाणे सट्टा मटका घेण्यात आला त्या सट्टाच्या चिठ्ठीचा फोटो आपण बघू शकता. लागलीच अजून २४ तास पूर्ण होत नाही तोवर दुसऱ्याच दिवशी खत्री गल्लीत पुन्हा ” जैसे थे ” परिस्थिती ” ये रे माझ्या मागल्या ” म्हणत सट्टा पुन्हा सुरू करण्यात आला. यामुळे नेमकी एक दिवस आधी करण्यात आलेली कारवाई कशासाठी करण्यात आली असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला असून फक्त कागद रंगवण्यापुरती देखावा म्हणून हप्तेवाढीसाठी थातूर-मातूर तर ही कारवाई करण्यात आली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करत परिसरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये खमंग चर्चा रंगत आहे.
प्रसामाध्यमांमध्ये बातमी आली की मुक्ताईनगर शहरामध्ये अशा किरकोळ कारवाया केल्या जातात. एकंदरीत तोवर प्रशासनास अवैध धंदे दिसत नाहीत का? की त्याला आर्थिक हित संबंधांची किनार आहे, की आणखी दुसरे काय कारण असावे ? हा संशोधनाचा विषय ? परंतु देखावा म्हणुन मोठ्या माशांना सोडत प्याद्याना पकडलं जाते, कारवाई केल्याचा देखावा केला जातो, नंतर पुन्हा जैसे थे सट्टा खेळला जात आहे, नेमकी कारवाई कुठल्या स्वरूपात झालेली आहे हे सुद्धा नागरिकांना कोड पडत आहे. पोलीस प्रशासनाने तर अश्या प्रकारची सूट दिली नाही ना? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे, कारवाई केल्याचे सांगण्यात येत व लगेच सट्टा चालू करण्यास रान खुले करण्यात येत, यामुळे शहरासह तालुक्यात मोठी आर्थिक उलाढाल ठप्प होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली असून पोलिस हवलंदारापासून अधिकाऱ्यांपर्यंत या सट्टा साम्राटांकडून वरकमाई होत असल्याने सूट दिल्याची चर्चा परिसरासह तालुक्यात ऐकायला मिळत आहे. त्यामुळेच की काय गल्ली पासून जळगाव पर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून सदरील अवैध धंद्यांवर बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात असून यामुळे आता आयजी पथकाच्या कारवाईची मागणी परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.