बोदवळच्या बैठकीत डॉ.राजेंद्र फडकेंचे एकनाथ खडसेंवर नामोल्लेख न करता टिकास्र
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। भाजपचे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विरूध्द आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसत असून जिल्ह्यातील पक्षाच्या बैठकींमध्ये त्यांनी खडसेंवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
भाजपच्या बूथ संपर्क अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील बैठका घेण्यात येत आहे या दरम्यान, बोदवड येथील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉ.राजेंद्र फडके यांनी खडसेनां टोला लगावत म्हणाले, ” त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने खापर ब्राह्मणांवर फोडले पण, स्व. अशोक फडके नावाच्या ब्राह्मणाने उदारभाव दाखवला म्हणून तुम्हाला त्या काळी पक्षाचे तिकिट मिळाले !” ते पुढे म्हणाले… बरे झाले…त्यांच्या जाण्याने त्यांचा जातीवाचक चेहरा तरी सर्वांसमोर आला. ते मतदारसंघात चांगला लीड मिळत नाही म्हणून नेहमीच मराठ्यांना दोष देत राहिले. विधान परिषदेत मुलाला दादांनी मदत केली नाही म्हणून राजस्थानी समाजावर आगपाखड केली. दादांना सदैव मंगळसूत्र बदलणारी बाई म्हणून हिणवले. आता मुख्यमंत्री पद न मिळाल्याचे खापर ब्राह्मणांवर फोडले. पण, स्व. अशोक फडके नावाच्या ब्राह्मणानेच उदारभाव दाखवला म्हणूनच तुम्हाला त्या काळी पक्षाचे तिकीट मिळाले होते अशी आठवण त्यांनी करून दिली. तर बारा बलुतेदार, अठरापगड जातींनी पक्षावर विश्वास दाखवला म्हणून तुम्ही आतापर्यंत निवडून आलात असे, यावेळी त्यांनी खडसेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.
आतापर्यंत पक्षाने त्यांना एवढे दिले, तरीही त्यांना पूर्ण भरलेला ग्लास कधीच दिसलाच नाही. केवळ ग्लासामध्ये शिग मिळाली नाही म्हणून पक्ष सोडला, असेही डॉ.फडके यावेळी बोलले. ते पुढे म्हणाले, उडालेल्या कावळ्यांच्या जोरावर कधीही गड किल्ले जिंकता येत नाहीत. ते जिंकण्यासाठी मावळ्यांचीच गरज असते आणि असे मावळे आज भारतीय जनता पक्षासोबत आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जातीवाचक भाव भाजप कधीच खपवून घेणार नाही. त्यांच्या जाण्याने खर्या कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करताना अडचणी येणार नाही, तर मतदारसंघात आता काही चांगले चेहरे पुढे येतील असेही ते म्हणाले. या बैठकीला डॉ.राजेंद्र फडके, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजय भोळे, जि. प. माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, जामनेरचे माजी पंचायत समिती सदस्य नवलसिंग पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, अनंतराव कुलकर्णी, अनिल खंडेलवाल, सुधीर पाटील, नाना कदम, राजू साबळे, प्रवीण परदेशी, व भाजपचे कार्यकर्ते आदींचा समावेश होता.