राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपच्या गळाला? NCP कडुन वृत्ताचे खंडन !
मुंबई (वृत्तसंस्था)। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. पण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
नवाब मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहे. पण, ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली. तसंच, विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. आता हेच नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे. या नेत्यांना परत पक्षात घ्यायचे की नाही, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेऊन घोषणा केली जाईल, असंही मलिक यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा प्लॅन भारतीय जनता पक्षाने आखला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.