ओमिक्रॉन तब्बल 6 पट डेल्टापेक्षा बलशाली, जाणून घ्या त्याची लक्षणे,
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। एक अतिशय महत्त्वाची आणि आपल्या आरोग्याशी निगडीत अशी बातमी. कोरोनाचा ओमिक्रॉन हा विषाणू डेल्टापेक्षा तब्बल 6 पट बलशाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काहीही त्रास झाला तरी चालेल. सर्व नियमांचे पालन करा. विशेषतः मास्कचा आवर्जुन वापर करा.
प्रतिकारशक्तीला चकवा
कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन. जगासमोरची सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या विषाणूची परिणामकारता, संहारकता कैक पटीने जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर देशात त्याच्यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार तो डेल्टापेक्षा 6 पट जास्त बलशाली म्हणजे संसर्ग करणारा आहे. विषाणूचा हा प्रकार आपल्या प्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, हा विषाणू अति संसर्गजन्य आहे. तो लस आणि नैसर्गिक प्रतिकारशस्तीला निष्प्रभ करू शकतो.
खूप लवकर स्वरूप बदलतो
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन विषाणू खूप लवकर त्याचे स्वरूप बदलतो. यापूर्वी इतके बदल कोणत्या विषाणूमध्ये पाहिले नाहीत. विशेष म्हणजे वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू बीटा आणि डेल्टापेक्षा अनुवंशिक रूपाने वेगळा आहे. मात्र, त्याच्यातील हे बदल धोकादायक आहेत की नाही, याची माहिती अजून उपलब्ध झाली नाही.
मोनोक्लोनल थेरपी निरोपयोगी
आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्ग करणारा विषाणूचा प्रकार म्हणून डेल्टाकडे पाहिले गेले. मात्र, त्याच्यावर मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा उपयोग व्हायचा. मात्र, डेल्टा प्लसवर या थेरपीचा उपयोग व्हायचा नाही. आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या विषाणून प्रकारावरही मोनोक्लोनल थेरपी निरोपयोगी ठरत असल्याचे समोर आले आहे.
ही आहेत लक्षणे
दक्षिण आफ्रिकेत सर्वात अगोदर विषाणूचा हा प्रकार ओळखणाऱ्या डॉ. एंजेलीके कोएट्जी बीबीसीशी बोलताना म्हणाले की, मी याची लक्षणे सर्वात अगोदर कमी वयाच्या व्यक्तीत पाहिली. ज्याचे वय 30 वर्षे होते. तो रुग्ण खूप थकलेला असायचा. डोके दुखायचे. पूर्ण शरीरात वेदना व्हायची. त्याचा घसा खवखवायचा. मात्र, त्याला सर्दी वगैरे नव्हती. चव आणि वास ही त्याला ओळखू यायचा नाही. मात्र, थोड्या रुग्णांचे निरीक्षण करून ही लक्षणे सांगितली आहेत. मोठ्या समूहात किंवा अधिक लोकांमध्ये याची लक्षणे नेमकी कशी असतील, याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.
तर घरीही उपचार शक्य
डॉ. कोएटजी म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील एक व्यक्ती कोविड-19 च्या नव्या विषाणूने बाधित होता. त्याच्या पूर्ण कुटुंबाची तपासणी केली. मात्र, दुर्दैवाने सर्व सदस्यांना संसर्ग झालेला होता. तरीही त्यांच्यात खूप साधारण लक्षणे आढळून आली होती. अशा रुग्णांना लगेच रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. त्यांच्यावर घरीही उपचार केले जाऊ शकतात.
या देशांत ओमिक्रॉन
दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमिक्रॉन हा विषाणूचा अनेक देशांमध्ये फैलाव झाला आहे. जर्मनी, इटली, बेल्जियम, इस्त्रायल, हाँगकाँगमध्ये या विषाणूचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क, सुरक्षित अंतर आणि चाचण्यावर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अमेरिकेतही असे रुग्ण सापडायची शक्यता व्यक्त केली जात आहे.