अल्पवयीन मुलीवर अत्याचार,१३ जणांवर गुन्हे दाखल, चार जणांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर येथे खळबळजनक घटना घडकीस आली आहे. येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसूती केली आहे. एवढेच नव्हे तर संबंधित प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी संबंधित बाळ मुंबईतील एका कुटुंबाला दत्तक म्हणून दिले आहे. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोन युवकांसह चार जणांना अटक केली आहे.
या आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
तसेच पिडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवते. मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी या मुलीची घरातच प्रसुती करण्यात आली ज्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. याबाबत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे – खराडे यांना याबाबत माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देली.
दरम्यान संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेत माहिती घेतली असता संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ शीतल जानवे – खराडे यांनी विश्वासात घेत तपास सुरू केला व संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हे दाखल केले असून चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणात नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या दोन्ही मुलांसह ९ जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.