तज्ज्ञांच्या मते राज्यात तिसरी लाट शिखरावर ; मृतांच्या संख्येत आठवड्याभरात दुपटीहून अधिक वाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। मुंबई, ठाण्यातील करोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत असली तरी अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र प्रादुर्भाव वेगाने होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मृतांच्या संख्येतही सुमारे दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या आणि बाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असले तरी मुंबई, ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाची तिसरी लाट शिखरावर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख सुमारे ४५ हजारांवरून २७ हजारांपर्यंत खाली उतरला आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही कमी झाले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने सर्वोच्च शिखर बिंदू केव्हाच गाठला असून आता लाट उतरणीला लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जाहीर केले. परंतु राज्याच्या करोना कृती दलाने मात्र हे अमान्य केले आहे. राज्यात मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये निश्चितच करोनाची तिसरी लाट उतरणीला लागली असून रुग्णसंख्या वेगाने कमी झाली आहे. परंतु अन्य जिल्ह्यांमध्ये अजूनही तिसरी लाट शिखरावर आहे. बाधितांची संख्या आणि बाधितांचे प्रमाण कमी असले तरी प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही, असे मत कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
राज्यात दैनंदिन सुमारे दीड लाख चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील सुमारे ४० हजार चाचण्या मुंबईत केल्या जातात. त्या तुलनेत अन्य जिल्ह्यांमध्ये चाचण्यांचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे बाधितांची संख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात प्रादुर्भाव कमी झाला असे म्हणता येणार नाही, असे कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले.
बाधितांची संख्या आणि प्रमाण यापेक्षाही रुग्णालयात दाखल होणारे, प्राणवायूची आवश्यकता असणारे आणि गंभीर रुग्णांच्या संख्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
राज्यात १६ ते २२ जानेवारी या आठवड्यात २१२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर २३ ते २९ जानेवारी या कालावधीत मृतांची संख्या ४५१ वर गेली. याचा अर्थ मृतांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. राज्यात डिसेंबरमध्ये एकूण २३३ रुग्णांचा मृत्यू झाला होता, परंतु जानेवारीमध्ये मृतांची संख्या जवळपास पाच पटीने वाढून १,११२ वर गेली आहे. सर्वाधिक मृत्यू मुंबईत होत असून त्या खालोखाल पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि नाशिक येथील मृतांचे प्रमाण आहे.
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
रुग्णवाढ सुरू झाल्यापासून साधारण तिसऱ्या आठवड्यानंतर मृतांची संख्या वाढायला सुरुवात होते. राज्यात तिसरी लाट मागील दोन आठवड्यांत वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता हळूहळू मृतांच्या संख्येत वाढ होऊ लागेल असा अंदाज होता. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण कमी असले तरी येत्या काळात ते आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मृत्यू झालेले बहुतांश रुग्ण हे ६० वर्षांवरील होते. त्यांना दीर्घकालीन आजारही होते. त्यामुळे प्रत्येक जीव वाचविण्यासाठी रुग्णांचे वर्गीकरण योग्यरीतीने केले जाणे आणि जोखमीच्या गटातील व्यक्तींना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
आणखी दोन आठवड्यांनी लाट ओसरेल…
तिसरी लाट मुंबई, ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमधून छोट्या शहरांमध्ये पसरत आहे. यानंतर खेड्यांमध्ये प्रादुर्भाव होईल. त्यामुळे राज्यभरात अन्य जिल्ह्यांमध्ये आणखी दोन आठवडे तिसरी लाट उच्चांकावर असेल. त्यानंतर मात्र ती ओसरायला सुरुवात होईल. बहुतांश रुग्ण ओमायक्रॉनचे असल्यामुळे या लाटेची तीव्रता कमी आहे. आर्थिक आणि शैक्षणिक चक्र सुरू ठेवणे गरजेचे आहे, असेही कृती दलाने स्पष्ट केले.
मुंबई, ठाण्यात रुग्णघट
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमधील प्रादुर्भाव वेगाने कमी होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्येत अनुक्रमे ५० आणि ३० टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईत बाधितांचे प्रमाणही १८ टक्क्यांवरून ८ टक्के झाले आहे, तर ठाण्यामध्ये २७ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आले आहे. रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्येही संसर्ग हळूहळू कमी होत आहे. राज्यात सध्या सर्वांत कमी सुमारे ८ टक्के बाधितांचे प्रमाण हे मुंबई आणि पालघरमध्ये आहे.