संप करणाऱ्या एसटी कर्मचार्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई – परिवहन मंत्री अनिल परब
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। एसटी ही अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे आम्ही एसटी कर्मचार्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याबाबत गंभीर आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कारवाई करू, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचार्यांना दिला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सलग 60 दिवस संप सुरू राहिल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो अशा अफवा एसटी कर्मचार्यांमध्ये पसरवल्या जात आहेत. याला बळी पडून एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, यामध्ये तथ्य नाही. विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असणार्या कर्मचार्यांना माझे सांगणे आहे की, न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्ही योग्य निणर्य घेऊ. तसेच आम्ही दिलेली पगारवाढ ही तात्पुरती असल्याचे काहीजण सांगत आहेत मात्र त्यातही तथ्य नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले. मी पुन्हा सांगतो पगारवाढीचे लेखी आदेश आम्ही काढले आहेत. ती मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले. बर्याच कामगारांना कामावर यायचे आहे. परंतु काही कर्मचारी त्यांना मारहाण करत आहेत. याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे ज्या कर्मचार्यांना कामावर यायचे आहे त्यांना अडवणार्या कर्मचार्यांसाठी आम्ही ‘मेस्मा’ लावण्याचा विचार करत असल्याचे परब यांनी सांगितले.
मी राज्यातील अधिकार्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यामध्ये एसटीचे आतापर्यंत साडे चारशे कोटींचे नुकसान झाले आहे आणि दिवसागणिक ते वाढत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जी कारवाई केली आहे ती कारवाई आता मागे घेणार नाही. संप संपला तरी केलेली कारवाई लवकर मागे घेतली जाणार नाही. या संपाला आता नेता नाही. पण जो कुणी कर्मचार्यांना भडकावत आहे त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारण आता आम्हाला जनतेला न्याय द्यायचा आहे, असेही परब म्हणाले.
विलीनीकरणाच्या मागणीबाबत मुंबई हायकोर्टाने जी समिती नेमली आहे ती समितीच याबाबत निर्णय घेईल. या समितीसमोर विविध संघटना आपले म्हणणे मांडत आहेत, सरकारही आपले म्हणणे मांडत आहे. विलीनीकरणाबाबत समितीचा जो अहवाल येईल तो मुख्यमंत्र्यांना सादर होईल, त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील. विलीनीकरणाच्या मागणीवर जे कर्मचारी ठाम आहेत. त्यांना पुन्हा सांगतो की हा निर्णय समिती आणि हायकोर्टाद्वारेच होईल.
आंदोलनस्थळी आणखी एका कर्मचार्याचा मृत्यू
महिनाभरापासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. नांदेडमध्ये संपादरम्यान गुरुवारी दिलीप वीर (50) या एसटी कर्मचार्याला भोवळ आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त कर्मचार्यांनी मृतदेह बस स्थानकात आणून ठेवला. गुरुवारी दिलीप वीर यांना कर्तव्यावर बोलावण्यात आले होते. पण ते हजर झाले नाही. त्यांना दोन मुले दोन मुली आहेत. मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने आर्थिक परिस्थिती देखील गंभीर बनली होती. मयत दिलीप वीर यांच्या कुटुंबाला तातडीने 50 लाखांची रोख मदत करावी. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.