महाराष्ट्रात दारू होणार स्वस्त,राज्य सरकारने उत्पादन शुल्कात केली कपात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसेवा। राज्य सरकारने इम्पोर्टेड म्हणजेच देशाबाहेरुन आयात केल्या जाणाऱ्या स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) तब्बल ५० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे आता राज्यातील इम्पोर्टेड मद्याचे दर इतर राज्यांच्या तुलनेत समान होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्कॉच आणि व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कातील मिळकत आता ३०० टक्क्यांवरुन १५० टक्क्यांवर आणली आहे. गुरुवारी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच या आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे राज्यात होणारी मद्य तस्करी आणि बनावट दारु विक्रीला काही प्रमाणात आळा बसू शकतो. तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो असतो. तसेच महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केल्यामुळे व्हिस्कीच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.