महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद,परीक्षा ऑनलाईन – उदय सामंत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट राज्यावर घोंगावते आहे. मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांच्या बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून सुरक्षितता प्राधान्यस्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच वसतीगृहाच्या बाबतीतला आढावा घेण्यात आला. राज्यातील परिक्षांबाबतचा आढावा घेतला असून कुठे कोणत्या परीक्षा सुरू आहेत याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे. हा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा प्राधान्यस्थानी आहे. त्यामुळेच सर्व अकृषी विद्यापिठे, अभिमत विद्यापिठे, स्वयंअर्थसहाय्यक विद्यापिठे, तंत्रनिकेतन, विद्यापिठांची संलग्न महाविद्यालयाचे वर्ग हे १५ फेब्रुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
विद्यापिठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने
यापूर्वीसारखेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीने कॉलेजेसमध्ये शिक्षण सुरू राहील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. विजेची उपलब्धतता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनी घेणे गरजेचे आहे. तसेच एखादा विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येणे किंवा विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या कारणामुळे त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची काळजीही विद्यापिठांनीही घेणे गरजेचे आहे असेही उदय सामंत म्हणाले. ही भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली असून अकृषी तसेच खाजगी विद्यापिठांमध्ये या नियमावलीचे पालन केले गेले पाहिजे असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले. कोंडवाना विद्यापीठ, जळगाव आणि नांदेड विद्यापीठ तीन ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असल्याने त्याठिकाणी परीक्षा ऑफलाईन होतील. त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घ्यायच्या आहे. इतर विद्यापिठांच्या कुलगुरूंनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचे मान्य केल्याने या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतो आहोत हा निर्णय जाहीर करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.