धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या बाबत पक्षाचा बैठकीत महत्वाचा निर्णय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, मुंबई।
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. यावरून सर्वच स्तरावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजीनाम्याबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत प्रफुल्ल पटेलांच्या घरी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राजीनाम्याबद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून बलात्काराच्या आरोपावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय पक्ष वरिष्ठांच्या बैठकीत घेण्यात आला असून रेणू शर्माविरोधात ब्लॅकमेलिंगच्या तीन तक्रारी आल्यानं धनंजय मुंडे सेफ असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडेवर थेट बलात्काराचे आरोप करण्यात आले. इतकंच नाही तर याप्रकरणी स्वत: धनजंय मुंडे यांनी लग्नाच्या बायकोशिवाय आपले आणखी एका महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पण त्याच महिलेच्या धाकट्या बहिणीने आता बलात्काराचा आरोप केल्याने धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केल्यानं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत. त्यात भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्यानं मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर धनंजय मुंडेंनी बुधवारीच पवारांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यापूर्वी त्यांनी फेसबूकवर या प्रकरणाचा खुलासा केला होता.