ओमायक्रॉनचा राज्यात आणखी एक रुग्ण,ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झाली ११
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन मुंबईत हातपाय पसरत आहे. मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये अखेर ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. परदेशातून आलेल्या एका व्यक्तीचा रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ख्याती असलेल्या धारावी परिसरात ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाने कोरोना लसही घेतलेली नाही. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून भारतामध्ये परतली होती. त्यानंतर आता या व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीला सध्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात दोघेजण आले होते. त्यांचाही माग काढण्यात यश आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
यापूर्वी कोरोनाच्या दोन्ही लाटांवेळी धारावी परिसरात मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळून आले होते. हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे महानगरपालिका नेहमीच याठिकाणी विशेष काळजी घेताना दिसून येते. आतादेखील धारावीत ओमायक्रॉनचा रुग्ण सापडल्यानंतर पालिका काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धारावीत आज सापडलेल्या रुग्णामुळे आता महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे ३ रुग्ण आहेत.