एसटी कर्मचाऱ्याचा विष प्राशन केल्याने मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। इतर एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपलेही निलंबन होईल या भीतीने संपकरी एसटी कर्मचारी विशाल अंबलकर यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील सहाय्यक तांत्रिक पदावर विशाल अंबलकर हे कार्यरत होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी शासनात विलीनीकरणाच्या भुमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यासाठी पुकारलेल्या संपात अनेक जण आत्महत्या करु लागले आहेत. खामगाव येथील विशाल अंबालकर हे देखील संपात सहभागी झाले हाेते. दाेन दिवसांपुर्वी अस्वस्थ असलेले अंबालकर यांनी विष प्राशन केले. त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यान अंबालकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचा-याच्या आत्महत्येची भर पडली आहे.
दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट होत असून राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी आर्त हाक व मागणी एसटी कर्मचारी करीत आहे. तसेच राज्य सरकार ‘अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणार ?’ असा संतप्त सवालही आता विचारला जात आहे.