नवजात बालकांची तस्करी करणार्या टोळीचा पर्दाफाश; डॉक्टरसह ९ अटकेत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, मुंबई ।
नवजात बालकांची तस्करी करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यांत नऊजणांना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक नवजात बालकांची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खैरवाडी परिसरात राहणार्या महिलेची अलीकडेच प्रसृती झाली असून तिने तिच्या नवजात बालकाची एका महिला एजंटच्या मदतीने विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी युनिट एकच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. या महिलेविषयी चौकशी केल्यांनतर तिने तिच्या मुलाची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर रुक्सार, शहाजहान आणि रुपाली या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या चौकशीतून याकामी त्यांना इतर काही आरोपींनी मदत केल्याचे उघडकीस अले होते, त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून गितांजली सचिन गायकवाड, रुक्सार मोहम्मद शकील शेख, शहाजहान शौकत जोगीलकर, रुपाली शंकर वर्मा, संजय शांताराम पंडम, गुलशन खान, निशा अहिरे, आरती हिरामणी सिंग, डॉ. धनजंय मोगा अशी या नऊजणांची नावे आहेत. यातील धनंजय मोगा हा डॉक्टर तर आरती सिंग ही पॅथोलॉजी लॅब टेक्नीशियन म्हणून काम करते. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉ. मोगा हे होमोपॅथिक वैद्यकीय अधिकारी असून त्यांचे वरळी परिसरात एक खाजगी क्लिनिक आहे. याच क्लिनिकमध्ये त्यांनी एका महिलेची प्रसुती केली होती, तिच्या मुलाच्या विक्रीसाठी त्यांनी मदत केली होती. त्यासाठी त्यांना तीस हजार रुपयांचे कमिशन मिळाले होते. आरती ही सांताक्रुज येथे राहत असून ती सध्या एका खाजगी पॅथोलॉजी टेक्शीनियन म्हणून काम करते. तिने या टोळीला नवजात बालकांची विक्रीसाठी मदत केली होती. त्यासाठी तिला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आले होते. नवजात बालकांची विक्री करणारी एक टोळी असून या टोळीने आतापर्यंत मुंबईसह पुण्यातील काही जोडप्यांना नवजात बालकांची विक्री केली आहे. त्यासाठी प्रत्येक बालकामध्ये साठ हजार ते दोन लाख रुपये घेतल्याची कबुली दिली आहे.