बँक कॅशियरने ‘छमछम’वर उडवले ४३ लाख रुपये
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसस्था। लोअर परळमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कॅशियरने बँकेचे चोरलेले लाखो रुपये जुगार आणि छमछममध्ये उडविल्याचे समोर आले आहे. बँकेचे तब्बल ४३ लाख ५५ हजार रुपये चोरुन हे पैसे जुगार आणि बारबालांवर उडविल्याची कबुली कॅशियरने दिली आहे. हेमंत जाधव (५५) असे या कॅशियरचे नाव असून त्याला ना.म.जोशी पोलिसांनी अटक केली आहे.
कसे चोरले लाखो रुपये?
लोअर परळ येथील मॅरेथॉन टॉवरमध्ये स्टेट बँकेची शाखा असून या शाखेमध्ये हेमंत जाधव हे कॅशियर या पदावर काम करत होते. बँकेच्या दैनंदिन रकमेचा हिशेब ठेवण्यापासून ते ती जमा झालेली रक्कम तिजोरीत ठेऊन त्याची नोंद संगणकमध्ये करण्यापर्यंतची जबाबदारी जाधव यांच्याकडे होती. कॅशिअर हे पद मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा घेत बँकेचे पैसे चोऱ्याचे समोर आले आहे.
सुट्टी घेतल्याने उघडकीस आला प्रकार
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कॅशियर हेमंत जाधव यांनी १४ सप्टेंबर रोजी सुट्टी घेतली होती. जाधव सुट्टीवर असल्याने कामाची जबाबदारी एका महिला अधिकाऱ्याकडे देण्यात आली. बँकेचे आर्थिक व्यवहार झाल्यानंतर त्या महिलेने बँकेची रक्कम तिजोरीत ठेवली आणि संगणकामध्ये नोंद करण्यास गेली असता तिला रक्कमेत गडबड असल्याचे दिसून आले. ३१ मार्च २०१८ पर्यंतचा रेकॉर्ड बरोबर होता. मात्र त्यापुढील रक्कमेत गडबड असल्याचे तिला आढळले. महिला अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हेमंत यांना बोलावून त्यांची १५ सप्टेंबरला बैठक बोलावली. मात्र या बैठकीला हेमंत हे गैरहजर राहिले. त्यानंतर हेमंत जाधव याच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आणि तपासात हेमंतने चोरी केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला करी रोड येथील घरातून अटक केली.
व्हॉट्सअॅपवरुन चोरीची दिली कबुली
महिला अधिकाऱ्याने हा घडलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर हेमंत जाधवला याबाबत विचारणा केली. याबाबत फोनवर विचारणा केली असता कॅशियरने थातुरमातुर उत्तरे देऊ लागला. मात्र त्याच रात्री त्याने ही चोरी आपणच केल्याची कबुली देत एक व्हिडिओ तयार करुन बँकेच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रसिद्ध करत गुन्ह्याची कबुली दिली.
कोणतेही दान केलेले नाही
कॅशियरने बँकेतून काढलेले पैसे रुग्णालयाला दान केल्याचे हेमंत जाधव यांनी सांगितले. टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालय आणि वाडिया रुग्णालयातील गरीब रुग्णांना पैसे दान केल्याचे हेमंत जाधव यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी सर्व रुग्णालयामध्ये चौकशी केली असता हेमंत यांनी कोणतेही दान न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर बारवाल्यांनीही हात झटकले आहेत.
लोअर परळ येथे असणाऱ्या स्टेट बँकेतून ४३ लाख रुपये चोरणारा कॅशियर हेमंत जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालय, आश्रमशाळा या ठिकाणी तो पैसे दान केल्याचे सांगत होता मात्र त्याची नोंद कुठेही आढळून आलेली नाही. बारवालांवर पैसे उडवल्याची कबुली त्यांने दिली असून आम्ही अधिक तपास करीत आहोत. – पंडित थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा