सावधान ! 60 लाख लोकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसणार-आरोग्यमंत्री टोपेंचं भाकित
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरते आहे. अनेक राज्यांत परिस्थिती सामान्य होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचं चित्र आहे. हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत नसलं, तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. 4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते, असा अंदाजही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेत एकूण 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली होती. मात्र तिसऱ्या लाटेत जर बाधितांची संख्या जर 60 लाखांवर गेली, तर निश्चितपणे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालत आहे. विशेषतः लसीकरण झालेल्या ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील बहुतांश रुग्ण हे डेल्टा व्हायरसचे असल्याचं दिसून येत आहे. अर्थात, लसीकरण झालेल्यांना लागण होत असली, तरी त्याचं गांभिर्य कमी असल्याचंही दिसून आलं आहे. ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांना नव्या व्हेरियंटची लागण झाली, तरी केवळ किरकोळ लक्षणे दिसतात, मात्र जीवावर बेतण्याइतपत परिणाम होत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेअगोदर अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण होणं गरजेचं असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.