महाराष्ट्र

‘मोठ्या लोकांनी माझा प्यादा म्हणून वापर केला’, चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेचा खुलासा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ,वृत्तसंस्था। या सर्व प्रकरणात मोठ्या लोकांनी माझा प्यादा म्हणून वापर केला आहे, जे हे लोक सांगत होते ते मी ऐकत होतो, असा खुलासा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने न्या. चांदीवाल आयोगासमोर केला आहे. न्या. चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या कथित वसुलीच्या आरोपाची चौकशी सुरू आहे. या चौकशीत सचिन वाझे याचादेखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे. वाझेने केलेल्या खुलाशाबाबत आज मंगळवारी उलटतपासणी करण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार मधून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, तसेच ईडीनेदेखील मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला असून दिवाळीपूर्वी अनिल देशमुख यांना अटक केली आहे. दरम्यान, या सर्व आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने न्या. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले. चांदीवाल आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात अनेकांचे जाबजबाब नोंदवले गेले आहेत. दरम्यान, आयोगाकडून परमबीर सिंह यांना अनेकवेळा समन्स पाठवूनही ते आयोगासमोर हजर झालेले नाही. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधीकारी सचिन वाझे याच्याकडेदेखील यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे. सचिन वाझे सध्या अँटिलीया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तळोजा तुरुंगात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!